शिरूर : महाराष्ट्राची लाडकी गायिका कोमल पाटोळे मेंढापूरकर हिने रविवारी रांजणगाव गणपती येथे आपल्या सुमधुर आवाजाने आणि बेधुंद नृत्याने रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. प्रचंड गर्दीत सुरू झालेला हा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत रंगला.
सोशल मीडियावर कोमल पाटोळे यांची गाणी अत्यंत लोकप्रिय असल्यामुळे प्रेक्षकांचा या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.गण आणि त्यानंतर असा कसा तुझा खट्याळ बाई कान्हा… या कोमल ताई च्या लोकप्रिय गवळणीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर लेकीवर गायलेल्या ‘जावई ट्रॅक्टरवर… मैना मोळ्या गं वाहायची’ या गीताने समस्त महिलावर्गाच्या डोळ्यात पाणी आले.
आंबा कलुगळाचं पाणी ग आंबा…
खंडोबाची कारभारीण बानू झाली धनगरीण….
आई माझी मायेचा सागर…
नथ मोत्याची नाकामधी ग आंबा… सवारी भवानी चौकामधी ग
देव बोलाया लागला बानुला गाव माझं जेजुरी जी….
धनगराच्या बानु बाईला नांदु मी देणार नाय..।
काळी मैना दिसतेस तरुण… अशा एकसे बढकर एक गीतांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
संबळ, ढोलकी, तुणतुणे, हार्मोनियम आधी वाद्यांच्या साथीने कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला तर स्वतः कोमल पाटोळे यांनी वाजविलेल्या अप्रतिम दिमडीने कार्यक्रमाला चार चाँद लागले. विशेष म्हणजे महिला वर्गाची या कार्यक्रमाला मोठी गर्दी होती. कोमल ताई पाटोळे यांच्याबरोबर काही प्रेक्षकांनीही नृत्याचा व गायनाचा आनंद घेतला. एका चिमुकलीने गायलेल्या ‘आई माझा मायेचा सागर’ या गीतामुळे त्या चिमुकलीचे कोमल ताईंनी भरभरून कौतुक केले.
रांजणगाव हे कलेचे जाणकार आणि कलेची कदर करणारे गाव आहे. माझ्या एका गाण्यानेच बक्षीसाच्या पैशाने तुणतुणे भरून गेले. तमाम रांजणगावकर यांचे प्रेम मी कधीच विसरू शकत नाही, अशा शब्दात कोमल पाटोळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
from https://ift.tt/g9MKmYr
0 Comments: