शिरूर : गणेश भक्तांसाठी हेलिकॉप्टरद्वारे अष्टविनायक यात्रेला बुधवारपासून प्रारंभ झाला. काल सकाळी 10 वाजता रांजणगाव गणपती देवस्थानच्या जागेत बनविलेल्या खास हेलिपॅडवर सहा गणेश भक्तांना घेऊन आलेले हे हेलिकॉप्टर उतरले. यावेळी रांजणगाव देवस्थानच्या विश्वस्तांनी या गणेश भक्तांचे स्वागत केले. अष्टविनायक हेलिकॉप्टर सेवा कधी सुरू होणार, याबाबतच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. भाविकांमध्ये याबाबत कमालीची उत्सुकता होती.
राज्यातील गणेशभक्त अष्टविनायक गणपती दर्शन हे श्रद्धा म्हणून चोवीस तासांत पूर्ण करतात; परंतु ज्या गणेश भक्तांकडे वेळ कमी आहे अशा व्हीआयपी भक्तांसाठी अष्टविनायक गणपतींचे दर्शन हेलिकॉप्टरद्वारे फक्त सात तासांत करता येणार आहे.
अष्टविनायक यात्रा बुकिंग करणाऱ्या भाविकांना ओझर या ठिकाणी तीर्थयात्रेच्या अगोदरच्या दिवशी व्हीआयपी भक्तभवनमध्ये मुक्काम, तसेच महाप्रसाद व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी साडेसहा वाजता श्रींना भाविकांच्या हस्ते महाभिषेक करण्यात येणार आहे. भाविक आठ वाजता तीर्थयात्रेला हेलिकॉप्टरने रवाना होणार असून, दुपारी एक वाजता लेण्याद्री या ठिकाणी यात्रा पूर्ण करून येणार आहेत व गिरीजात्मकाचे दर्शन झाल्यावर बसद्वारे ओझर येथे आल्यावर तीर्थयात्रेची सांगता होणार आहे.
सर्वसामान्य भाविकांनादेखील वातानुकूलित बसद्वारे अष्टविनायक दर्शन घडविण्याचा देवस्थानचा मानस आहे. या भाविकांनादेखील श्रींचे दर्शन घेताना रांगेत दर्शन घ्यावे लागणार नाही. तीर्थयात्रा करणाऱ्या भाविकांना थेट दर्शन व्यवस्था करण्यात येणार आहे व या भाविकांनादेखील तीर्थयात्रेच्या अगोदरच्या दिवशी मुक्काम, महाप्रसाद, दर्शन, अभिषेक व्यवस्था करण्यात येणार आहे.
रांजणगाव गणपती देवस्थानची स्वतःच्या मालकीची 100 एकर जमीन आहे. या जमीनीवरच हेलिकॉप्टर साठी हेलीपॅड बनविण्यात आले आहे. या ठिकाणाहून देवस्थानच्या विशेष वाहनातून या सहा गणेश भक्तांना दर्शनासाठी मंदिराकडे नेण्यात आले.बुधवारी प्रथमच या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरल्यावर स्थानिक ग्रामस्थांनी पहाण्यासाठी एकच गर्दी केली.
from https://ift.tt/x53dU2Q
0 Comments: