INFO Breaking
Live
wb_sunny

Breaking News

रस्ता झाला गुळगुळीत पण अपघातांची संख्याही वाढली !

रस्ता झाला गुळगुळीत पण अपघातांची संख्याही वाढली !

✒ सतीश डोंगरे 
शिरूर : अष्टविनायक यात्रा करणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा या हेतूने तयार करण्यात आलेल्या अष्टविनायक महामार्गावर सध्या अपघातांची मालिका चालू आहे. या अष्टविनायक महामार्गावर गेल्या वर्षभरात अकरा छोटे-मोठे अपघात घडले आहेत. त्यामुळे अष्टविनायक दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.सुमारे दीडशे कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या रांजणगाव – बाभूळसर खुर्द -करडे – आंबळे – न्हावरे – इनामगाव ते तांदळी पर्यंत अष्टविनायक मार्गाचे काम आता जवळपास पूर्ण झाले आहे. हाच रस्ता पुढे सिध्दटेकपर्यंत नेण्यात आला आहे. अनेक वर्षे खड्ड्यांनी व्यापलेल्या रस्त्याला आता अष्टविनायक मार्गामुळे झळाळी प्राप्त झाली आहे.
वाहतूक वाढल्याने या महामार्गालगत असणार्‍या गावांमध्ये व्यवसायही भरभराटीस येऊ लागले आहेत. इतकेच नव्हे तर महामार्गाच्या लगत असणाऱ्या जमिनींना सोन्याचा भाव येऊ लागला आहे. तर दुसरीकडे या महामार्गालगत असणारी घरे, शेतकऱ्यांची जनावरे यांना या वाढत्या वाहतुकीमुळे धोका निर्माण झाला आहे.
महामार्गाच्या मध्यभागी दुभाजक पट्टे नसणे, काही ठिकाणी मार्गाची रुंदी कमी होणे, चुकीच्या पद्धतीने बसविण्यात आलेले गार्ड स्टोन तसेच बेशिस्त वाहन चालकांमुळे हा रस्ता निष्पाप लोकांचे बळी घेतोय.
“सुसाट वेगाने पळणारी वाहने पाहिली की काळजात धडकी भरते. रस्त्यालगत घर असल्यामुळे रात्री झोपेतही या वाहनांचा आवाज कानात गुण गुण करीत असतो” असे इनामगाव येथील कार्यकर्ते अशोक निंबाळकर यांनी सांगितले.

ओव्हरटेक करणाऱ्या वाहनांना समोरच्या वाहनाची गती लक्षात येत नसल्यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे. ऊसाचे ट्रॅक्टर हे ही एक वाढत्या अपघाताचे कारण आहे तसेच रस्त्यांच्या कामात राहिलेल्या अनेक त्रुटी नागरिकांच्या जिवावर बेतत आहेत.
” करडे याठिकाणी महामार्गाच्या दोन्ही बाजूला गाव विभागले गेले आहे. त्यातच दैनंदिन व्यवहारासाठी दिवसभरात अनेकवेळा रस्ता पार करावा लागतो विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थी यांच्या साठी हे अत्यंत धोकादायक ठरत आहे,” असे सामाजिक कार्यकर्ते अमोल घायतडक यांनी सांगितले. ” या रस्त्यामुळे जोडल्या गेलेल्या गावांचे जीवनमान उंचावले गेले आहे, अर्थिक सुबत्ता वाढू लागली आहे हे जरी खरे असले तरी अपघात ही त्या प्रमाणात वाढत आहेत. अपघात घडल्यानंतर सुसज्ज असा दवाखाना जवळपास नसल्याने अपघातातील जखमींना तातडीच्या उपचाराअभावी प्राण गमवावे लागत आहे,” असे शिरसगाव काटा येथील माजी पंचायत समिती सदस्य राम कदम यांनी सांगितले.
रस्त्यावर सुसाट धावणाऱ्या अनेक वाहनचालकांकडून वाहतूकीचे नियम धाब्यावर बसविले जातात. त्यांच्यावर कुणाचेही बंधन नाही. दुचाकी चालकांना तर या रस्त्याने जीव मुठीत धरुनच चालावे लागते, असे आंबळे येथील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब शिवले यांनी सांगितले. बाभुळसर खुर्द गावात अष्टविनायक महामार्गाला दोन्ही बाजूंनी मोठा उतार आहे. त्यातच गावातील मुख्य चौकातून हा महामार्ग गेल्यामुळे अपघाताचा मोठा धोका संभावतो. भविष्यात वाहनांची वर्दळ वाढल्यानंतर याठिकाणी ठोस उपाययोजना कराव्या लागतील, असे बाभुळसर खुर्द येथील कार्यकर्ते एकनाथ वाळके यांनी सांगितले.


from https://ift.tt/cKBnSaX

0 Comments:

Responsive

Ads

Here