बाबावाडीत मुलांना काय शिकवले जाते?तिथे केवळ गाणी,खाऊ,खेळ हेच असतं.हे कशासाठी तर शाळेत येण्याची गोडी लागावी म्हणून. जीवनाची शाळा त्याहून अत्यंत कठीण आहे. या शाळेत बहुतेक जण दांड्या मारतात.मग सारं रटाळवाणं वाटु लागतं.आनंद नाहीसा होतो.प्रपंचातलं लटकेपण खुलुन दिसु लागतं.वारंवार खोटं बोलण्याची वेळ येते.परिवारातील सदस्यांशी खोटं बोलावं लागतं तेव्हा आपली जीवनयात्रा सत्मार्गाने चाललेली नाही हे पक्क समजा.
प्रपंच जेवढा सत्यानं कराल तेवढा तो कमी त्रास देतो.असत गोष्टीत प्रवेश करुन सत्यवान रहाणं सामान्य बाब नाही.
अध्यात्म हे बळ देण्यास समर्थ आहे. देवाची आठवण रहाणं म्हणजे नितीधर्म जीवंत ठेवणे आहे. त्याला अंधश्रद्धेच्या पायरीवर ठेवु नये.नितीधर्मानं वागणं ही अंधश्रद्धा नाही. तो नैतिक जीवन उजळून टाकणारा मार्ग आहे. आपण वाईट गोष्टींवर जेवढा विचार करतो त्याच्या निम्मा विचार जीवनशैली बदण्यासाठी पुरेसा आहे.
आपलं डोकं शांत आणि प्रसन्न राहिलं तर सर्व निर्णय आपण कुणावर अन्याय होणार नाही,याची दक्षता घेऊन करु शकु.अर्थात इथं प्रसन्न शब्दाला फारच महत्त्व आहे. कारण सत्कर्माशिवाय ते प्रसन्न रहात नाही.देव म्हणजे दुसरं तिसरं काही नाही ते आहे सतध्यान.सत्याला आकार नाही. ते डोळ्यांना दिसत नाही. ते प्रगट होतं,कर्मातुन.कर्म ताकदवान होण्यासाठी सतध्यान गरजेचं आहे. ते जमलं की मग प्रसन्न रहाणं अवघड नाही.
आपण ट्रकटेम्पोवरच्य कपाळपट्टीवर अमुक प्रसन्न, तमुक प्रसन्न अशी नावं वाचतो.त्यामागची भावना लक्षात घ्या.कर्मातला देव प्रसन्न होण्यासाठी,कर्मात सत्यता ठेवण्यासाठी ते प्रातिनिधीक आहे. किमान ते वाचुन तरी वाहन सुचिर्भुत होऊन,व्यसन न करता चालवण्याची प्रेरणा मिळावी हे त्यामागचं गणित आहे. पण ते जुळवता आलं नाही की मग काय होतं?जे नको तेच घडतं.आता आपल्या लक्षात आलं असेल की देव तर नेहमीच प्रसन्न आहे. कमी आहे ती आमच्यात.सत्कर्माने प्रसन्नता मिळवता येईल.
रामकृष्णहरी
from https://ift.tt/e87MxjK
0 Comments: